महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात १०६ गावांना दरड कोसळण्याचा धोका - raigad rainy season

रायगड जिल्ह्यात राज्य शासनाने ‘नैसर्गिक धोके सौम्यीकरण पथदर्शी प्रकल्प’ राबविला आहे. या प्रकल्पांतर्गत जुलै २००५ च्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यातील ८४ गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता.

raigad land slide
रायगड जिल्ह्यात १०६ गावांना दरड कोसळण्याचा धोका

By

Published : Jun 18, 2020, 2:17 PM IST

रायगड - जिल्ह्याला नुकताच निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी रायगडकर धडपड करत आहेत. त्यात आता पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती असते. रायगड जिल्ह्यात १०६ गावांमध्ये दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या सर्व गावांना प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. दरडग्रस्त गावांमध्ये अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील गावांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात राज्य शासनाने ‘नैसर्गिक धोके सौम्यीकरण पथदर्शी प्रकल्प’ राबविला आहे. या प्रकल्पांतर्गत जुलै २००५ च्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यातील ८४ गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ही संख्या १०३ वर गेली होती. आता ही संख्या १०६ वर पोहोचली आहे. रायगडमधील १०६ दरडग्रस्त वागांपैकी ९ गावे (वर्ग १) अतिधोकादायक, ११ गावे (वर्ग २) धोकादायक व ८६ गावे (वर्ग ३) सौम्य धोकादायक आहेत.

वृक्ष तोड, बेकायदा खोदकाम, पाण्याचा निचरा होणार्‍या मार्गात अडथळे, पावसाळी हंगामात जमिनीस भेगा पडणे, अस्थिर भूभागावरील बांधकाम ही दरड कोसळण्याची प्रमुख कारण आहेत. २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत वेलेटवाडी - अलिबाग, सागवाडी-अलिबाग, साळाव- मुरुड, भालगाव-रोहा येथे दरड कोसळली होती. पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) विभागाच्या शास्त्रज्ञांनी या गावांना भेट देऊन पहाणी केली. या पाहणीत शास्त्रज्ञांच्या अनेक धक्कादायक बाबी नजरेसमोर आल्या आहेत. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. मुरुड तालुक्यातील मिठेखार, अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी , रोहा तालुक्यातील शेणवई या गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या तीन गावांचा दरडग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

जुलै २००५ मध्ये दरड कोसळून झालेल्या आपत्तीच्या अनुभवावरून सदर सर्वेक्षण भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केले आहे. यामध्ये आढळून आलेल्या १०३ दरडग्रस्त गावांमध्ये अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, दरड कोसळण्याचे सावट अद्याप दूर झालेले नाही. यात आता नवीन ३ गावांचा समावेश झाला आहे.

तालुकानिहाय दरडग्रस्त गावे -

महाड ४९ ,पोलादपूर १५, रोहा १४, म्हसळा १६, माणगाव ५, सुधागड ३, खालापूर ३, कर्जत ३, पनवेल ३, श्रीवर्धन २, तळा १, अलिबाग १, मुरुड १

ABOUT THE AUTHOR

...view details