रायगड - आपण कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, किंवा जास्तीत जास्त पोपट, कबुतर पाळतो. मात्र, खारघरमधल्या एका कुटुंबाने आपल्या घरात चक्क मधमाशा पाळल्या आहेत. मधमाशी पालनाचा हा अजब छंद सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
अनेकजण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधमाशांची शेती करतात. पण, खारघरमध्ये राहणाऱ्या डॉ. स्वप्निल चौधरी यांनी छंद म्हणून थेट आपल्या घरातच मधमाशा पाळल्या आहेत. पहाट झाली की मधमाशांची स्वारी फुलांकडे झेपावते. त्या फुलांवर घोंगावू लागतात आणि हळूहळू त्याची संख्या वाढत जाते. झुंडीनं येणाऱ्या मधमाशा पाहून आता डॉ. चौधरी यांच्या मुलीनेही मधमाशांशी मैत्री केली आहे.
खारघरमधील डॉ. युवराज कागीणकर यांनी बी सिटी ही संकल्पना उदयास आणली. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आदींसह मोठ्या प्रमाणात युरोपात देखील ही संकल्पना राबविली जाते. मात्र, भारतात मधमाशी पालनाबाबत कोणतीही जनजागृती झालेली नाही. डॉ. कागीणकर यांनी पुढाकार घेऊन खारघरमध्ये घरोघरी मधमाशा पाळण्याचा हा उपक्रम वाढवला. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तर मिळतोच आहे. पण बाजारातील भेसळयुक्त मधाऐवजी शुद्ध मध चाखायला मिळण्याचा वेगळाच आनंद असल्याचा आनंद नागरिकात दिसून येत आहे.