रायगड -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचे सौम्य लक्षण असलेले आणि घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांना आता कोविड सेंटरमध्ये जाऊनच उपचार घ्यावे लागणार असल्याचे सांगितले आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यात घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना आता कोविड सेंटरमध्येच उपचार घ्यावे लागणार आहेत. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात 5 हजार 126 रुग्ण आहेत होम असोलेट
जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोना आटोक्यात येऊ लागला असून रुग्णंसख्येत घट होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 26 हजार 606 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 1 लाख 16 हजार 552 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 968 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 7 हजार 186 जणांवर उपचार सुरू आहे. यापैकी 5 हजार 126 सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरी म्हणजे होम असोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. तर 2 हजार 60 रुग्ण जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 18 जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद करण्याचे आदेश दिले असून या रुग्णावर कोविड सेंटरमध्ये आता उपचार होणार आहेत. या 18 जिल्ह्यात रायगडचेही नाव आहे. जिल्ह्यात 5 हजार 126 जण घरीच राहून उपचार घेत आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी पावले उचलली आहेत. गावागवात ग्रामसमिती स्थापन असून गावात होम आयसोलेट असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे. सामाजिक संस्थेतर्फे कोरोना रूग्णांना रोज औषधे उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
15 व्या वित्त आयोगाचा 25 टक्के निधी कोविड सेंटरवर खर्च करण्याचे ग्रामपंचायतींना निर्देश
कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच राहून उपचार घेत होते. मात्र आता अशा रुग्णांनाही कोविड सेंटरमध्ये ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. तर, ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतील 25 टक्के निधी गावात कोविड सेंटर उभारण्यासाठी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गावागावात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचार मिळाल्यास प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही कमी होणार आहे.