रायगड- अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उच्च दाब वीज वाहिनी जळाल्याने चार दिवसांपासून सिटीस्कॅन, एक्सरे मशीन उपकरणे वीज नसल्याने बंद आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याबाबत चार दिवसांनी हालचाल सुरू केल्यानंतर महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वीज वाहिनी केबल नसल्याने सिटीस्कॅन, एक्सरे विभागात विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची गैरसोय झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळावी, अशी रुग्णांची अपेक्षा असताना अनेक वेळा येथे रुग्णांची गैरसोय होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन, एक्सरे, सुविधा आहे. मात्र, त्यांच्या उपकरणासाठी उच्च दाब वाहिनीची गरज असते. यासाठी महावितरणने उच्च दाब वीज वाहिनी रुग्णालय परिसरात जोडली आहे. या उच्च दाब वाहिनीवरून सिटीस्कॅन, एक्सरे मशीन उपकरणे यांना वीज दिली आहे.