रायगड - कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या विद्युतीकरण कामासाठी लागणारी हायटेन्शन वायर चोरी करणारी टोळी गोरेगाव पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांनी पाच चोरांसह माल खरेदी करणाऱ्या व्यक्तीला असे सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मोटार सायकल, 135 मीटर वायर असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात या चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी कोकण रेल्वे मार्गावर माणगाव, गोरेगाव, इंदापूर या रेल्वे स्थानक परिसरात एल अँड टी कंपनीमार्फत विद्युतीकरण सात महिन्यापासून सुरू आहे. विद्युतीकरणाच्या कामासाठी हायटेन्शन वायर बसविण्याचे काम कंपनीमार्फत सुरू आहे. मात्र गेल्या सात महिन्यापासून हायटेन्शन वायर चोरीचे प्रमाण वाढू लागले होते. याबाबत कंपनीमार्फत माणगाव, गोरेगाव, कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. रेल्वे पोलीस आणि रायगड पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीही रेल्वे मार्गावर घातल्या जात होत्या. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते. गोरेगाव पोलिसांना अखेर गुप्त खबऱ्याकडून चोरी करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून पाच चोरट्यांना वायर चोरताना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर चोरीचा माल विकणाऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून चोरलेला उर्वरित माल ही लवकरच ताब्यात घेऊ, असे माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले आहे. पकडलेल्या चोरट्यांनी कोकण रेल्वे मार्गावरील इतर ठिकाणीही वायरची चोरी केली असल्याचा अंदाज आहे. सात महिन्यानंतर रायगड पोलिसांना हायटेन्शन वायर चोर टोळी पकडण्यात यश आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हा गोरेगाव पोलीस करीत आहेत.