रायगड - पेण तालुक्यातील अतोरे येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पेणमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहा किलोमीटर अंतराच्या आतील पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. बर्ड फ्ल्यूशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, जनतेने घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पेण तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अर्चना जोशी यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे.
रायगडात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव 16 जानेवारीला आला पॉझिटिव्ह अहवाल
पेण तालुक्यातील अतोरे येथे शासकीय पोल्ट्री फार्म आहे. पोल्ट्री फार्ममध्ये 562 कोंबड्या असून यातील 281 कोंबड्यांचा काही दिवसांपूर्वी मरण पावल्या होत्या. मरण पावलेल्या कोंबड्या पैकी पाच कोंबड्या पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्या होत्या. त्याचा अहवाल 16 जानेवारीला पॉझिटिव्ह आला आहे. पुढील तपासणीसाठी पक्षी हे भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत.
जनतेने घाबरु नये - पशू विभागाचे आवाहन
पेण तालुक्यामध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाली असली तरी जनतेने घाबरुन जाऊ नये. प्राथमिक ज्या उपाययोजना करायच्या आहेत, त्या आम्ही केल्या असून, सर्व दक्षता घेतली आहे, तसेच चिकन व अंडी खाण्यास काहीही हरकत नाही. मात्र, हे खात असताना 70 अंश सेल्सिअस तापमानावर शिजवून खावे, असे अर्चना जोशी यांनी सांगितले आहे.