रायगड- जिल्ह्यातून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त जनावरांना 107 टन चारा आणि पेंडा पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे शेतात उतरुन श्रमदान करुन हिरवा चारा कापण्यासाठी हातभार लावला. स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून हिरवा चारा कापून त्याचे भारे ट्रकद्वारे पूरग्रस्त भागात पाठवण्यात आला आहे.
पूरग्रस्त भागासाठी रायगडातून रसद; जनावरांसाठी पाठविला 107 टन हिरवा चारा - डॉ. विजय सूर्यवंशी
जिवंत असणाऱ्या जनावरांना खायला काय द्यायची ही चिंता तेथील शेतकऱ्यांना पडली आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील जनावारांना चारा पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. कुटूंब, घरे उद्धवस्त झाली, हजारो जनावरे मृत झाली. त्यामुळे तेथील जनतेच्या खाण्या- पिण्याचा प्रश्न निर्माण झाला. जिवंत असणाऱ्या जनावरांना खायला काय द्यायची ही चिंता तेथील शेतकऱ्यांना पडली आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील जनावारांना चारा पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत.
अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील माळ रानावरील शेतात असलेला हिरवा चारा कापून ट्रकमध्ये भरण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वतः शेतात उतरुन चारा कापण्यास मदत करीत होते. पशू, महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी हे सुद्धा शेतात उतरुन चारा कापून भारा डोक्यावर घेऊन ट्रकमध्ये भरत होते. तर स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःकडील एक- दोन भारे पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी पाठविले आहेत.
जिल्ह्यातून माणगाव येथून 12 टन, अलिबाग 60 टन, पेण 15 टन, पोलादपूर 10 टन, मुरुड 10 टन असा एकूण 107 टन चारा व पेंडा पुरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील जनावरांचा खाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.