महाराष्ट्र

maharashtra

रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस; अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन येथे दरड कोसळली

By

Published : Jun 9, 2021, 10:11 PM IST

जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. आज दिवसभर जिल्ह्यात पावसाची जोर कायम होता. अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन येथे दरड कोसळली. तर, अलिबाग येथील एक मच्छीमार दिनेश हरी राक्षिक बुडून बेपत्ता झाला.

Heavy rain in Raigad district
जोरदार पाऊस रायगड जिल्हा

रायगड - जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. आज दिवसभर जिल्ह्यात पावसाची जोर कायम होता. अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन येथे दरड कोसळली. तर, अलिबाग येथील एक मच्छीमार दिनेश हरी राक्षिक बुडून बेपत्ता झाला. अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दरडग्रस्त भागातील 314 कुटुंबातील 1 हजर 139 नागरिकांना, तर धोकादायक इमरतीतीत 15 कुटुंबातील 111 जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

हेही वाचा -ताकई रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे ट्रक पलटी

श्रीवर्धनमध्ये दरड कोसळली, जीवितहानी नाही

आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे, जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे यांसारख्या घटनांची नोंद झाली. पहिल्याच पावसात नद्या, नाले दुथडी भरून वाहण्यास सुरवात झाली होती. जिल्ह्यात श्रीवर्धन येथे रोहिदास आळीत जयवंत एटम यांच्या घरावर दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

अलिबाग समुद्रात एक जण बुडाला

जिल्ह्यात 9 ते 11 जून, या तीन दिवशी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याकाळात मच्छीमारीलाही बंदी घालण्यात आली आहे. असे असताना अलिबाग कोळीवाडा येथील दिनेश राक्षिकर हा सकाळी कुलाबा किल्ल्याच्या मागे खडकांत असलेली खुबी (कालवे) पकडण्यास गेला होता. त्यावेळी भरतीचे पाणी वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजता अरुण कुमार विद्यालयाच्या मागच्या बाजूस समुद्र किनारी सापडला.

मृत दिनेश राक्षिकर

दरदग्रस्त भागातील 314 कुटूंबातील 1139 जणांना हलवले

रायगड जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टी असल्याने मुसळधार पावसाने भूसखलन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 103 गावे ही दरडग्रस्त भागात आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने पेण तालुक्यातील 73 कुटुंबातील 309, कर्जत 7 कुटुंबातील 48, खालापूर 28 कुटुंबातील 102, महाड 164 कुटुंबातील 525, पोलादपूर 23 कुटुंबातील 68, म्हसळा 19 कुटुंबातील 47, श्रीवर्धन मधील 40 जणांना, असे 314 कुटुंबातील 1 हजार 139 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, धोकादायक घरातील 15 कुटुंबातील 111 जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

जिल्ह्यात सरासरी 58 मि.मी पावसाची नोंद

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग – 60 मि.मी, पेण – 58 मि.मी, मुरूड – 65 मि.मी, पनवेल – 113.60 मि.मी, उरण – 40 मि.मी, कर्जत – 41.80 मि.मी, खालापूर – 53 मि.मी, माणगाव – 53 मि.मी, रोहा – 64 मि.मी, सुधागड – 48 मि.मी, तळा - 56 मि.मी, महाड – 53 मि.मी, पोलादपूर - 43 मि.मी, म्‍हसळा – 53 मि.मी, श्रीवर्धन – 103 मि.मी, माथेरान – 39.40 मि.मी पाऊस पडला.

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन

दरम्यान येत्या २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य २० दरडग्रस्त गावांतील नागरिकांचे स्थलांतरण सुरू करण्यात आले आहे. तर, नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी समुद्र आणि नदीकिनाऱ्यावर पोहण्यास जाऊ नये, धबधब्यांच्या ठिकाणी वर्षासहलीस जाऊ नये, घरात सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले. आपतकालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस सर्व दुकाने बंद राहणार

10 आणि 11 असे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे, मुसळधार पाऊस आणि वारे वाहणार असल्याने दोन दिवस जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. वैद्यकीय सेवेतील रुग्णालये, मेडिकल, पॅथालॉजी सुरू राहणार आहेत. 10 आणि 11 जून दरम्यान इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले.

हेही वाचा -रायगड : कोल्हारे ग्रामपंचायतीकडून मच्छिमारांना साहित्य वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details