रायगड- जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले असून अतिवृष्टीमुळे सावित्री, आंबा, कुंडलिका, उल्हास, पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड, रोहा, नागोठणे, पेण, पनवेल, उरण, कर्जत या शहरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तर उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदी किनाऱ्यावरील कर्जत तालुक्यातील गावांना पुराचा तडाखा बसला आहे.
पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गावांमध्ये रस्ते खचले. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. काही ठिकाणी झाडे कोसळली. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी पावसामुळे झालेली नाही.
रायगड जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासात सरासरी २१३.३४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे एकूण पर्जन्यमान सरासरी ३१४२.६४ मिमी आहे. आतापर्यंत २१२३.९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पर्जन्यामानाच्या ६७.५८ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे. २६ जुलै रोजी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सावित्री नदीचे पाणी महाड शहरात घुसले. कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रोहे शहराच्या काही भागांत पाणी शिरले. रोहा-अष्टमी पुलावरून पाणी वाहत होते. तसेच अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात घुसले. भोगावती, काळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अलिबागमध्ये रामराज पुलावरून पाणी वाहून येऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
पोलादपूरमधील सावद, धारवली, वावे, हावरे, कालवली गावांचा संपर्क सुटला आहे. कर्जत उल्हास नदीचे पाणी कर्जत तालुक्यातील काही गावांमध्ये घुसले आहे. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा पाझर तलाव भरून वाहू लागल्याने या परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर रोहा, कर्जत, पनवेल तालुक्यातील काही भागात पाणी घुसल्याने येथील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.