रायगड - पावसाने जिल्ह्यात आठ दिवस उसंत घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून मुसळधार सुरुवात केली. येत्या 48 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात आज (24 जुलै) एकूण 1728.40 मिमी पाऊस पडला असून सरासरी 107.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहा तालुक्यात सर्वाधिक 290 मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरीही नदीकिनारी व समुद्र किनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे रायगडकर उन्हाच्या झळांनी घामाघूम झाले होते. आज मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने रायगडकर पावसात न्हाऊन गेले आहेत. तर मुसळधार पावसाने अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते.