रायगड - जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच आहे. सोमवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच नागोठणे पाली मधील अंबा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी घुसले आहे. शिवाय नागोठणे पाली येथील रस्त्यावरही पाणी साचल्याने काही काळ खोपोलिकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग रोहा तालुक्यातील तांबडी येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता. तसेच अलिबागमधील बिडवागळे येथील पूल तुटल्याने गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे पहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मंगळवारी पावसाने सकाळी थोडी उसंत घेतली असली तरी दुपारनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी आणि उन्नई या नद्या दुथडी भरून वाहत आहे.
शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. घरात घुसलेले पाणी काढण्याचे काम नागरिक करीत आहेत. नागोठणे पाली रस्त्यावरही पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता. पावसाने आता थोडी उसंत घेतल्याने वाहतूक सुरू झाली आहे. रोहा तालुक्यातील तांबडी रस्त्यावर पहाटे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली दरड काढल्यानंतर पाच तासानंतर वाहतूक सुरू झाली.
अलिबाग तालुक्यातील बिडवागळे पूल कोसळल्यामुळे शेताकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना शेतात जाण्यास त्रास सहन करावा लागला. शेतातही पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावसाने गेल्या पाच दिवसात जोरदार बॅटिंग केली असल्याने जिल्ह्यात सगळीकडे पाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुपारनंतर पावसाने उसंत घेतली असल्याने काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे.