रायगड- कुटुंबातील सदस्यांची सेवा करत असताना बहुसंख्य महिला आपल्या शरीराची काळजी घेत नाहीत. त्यामुळे चाळीशीनंतर वेळ निघून गेल्यावर अनेक दिर्घ आजारांना सामोरे जावे लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेत खोपोलीतील सुप्रसिद्ध महिला रुग्णालयात महिला दिनाच्या सप्ताह निमित्ताने स्त्रीरोग आणि स्तनाचा, गर्भशयाचा कॅन्सर निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातील 110 महिलांनी सहभाग नोंदवत उपचार घेतले.
कॅन्सरबाबत महिलांशी तज्ज्ञांनी केली चर्चा -
या शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातील 110 महिलांनी सहभाग नोंदवत उपचार घेतले असून स्त्रीरोग शिबिरात इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल आळंदी (पुणे) कर्करोग तज्ञ डॉ.समीर कोकणे, सह्याद्री हॉस्पिटल पुणे कर्करोग तज्ञ डॉ. श्रीराम इमानदार, जनरल सर्जन डॉ.अजय परांजपे, डॉ. हर्षद नेरकर भूल तज्ञ, स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ डॉ.चारूशिला नेरकर यांनी महिलांची तपासणी करून महिलांना होणाऱ्या आजाराबाबत चर्चा करून तपासणी केली आहे.