रायगड : जिल्ह्यात अलिबाग येथील उसर याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असताना आता फार्मा महाविद्यालय आणि शासकीय विधी महाविद्यालय माणगावमध्ये सुरू करण्याच्या हालचाली शासनातर्फे सुरू झाल्या आहेत. तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यासाठी सन २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी २७५ कोटींच्या सर्वसाधारण वार्षिक योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली असून ८६ कोटींचा वाढीव निधी जिल्ह्यासाठी दिला असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
जिल्ह्यात शासकीय फार्मासह विधी महाविद्यालयाची होणार सुविधा जिल्ह्याला ८६ कोटींचा वाढीव निधी मंजूरजिल्हा नियोजन समितीने १८९ कोटीच्या सर्वसाधारण वार्षिक योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रारुप आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी २७५ कोटींच्या वार्षिक योजनेला मंजुरी देण्यात आली. निसर्ग वादळाच्या पार्श्वभुमीवर राज्यसरकारकडून वाढीव निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आला. तब्बल ८६ कोटी रुपयांचा वाढीव निधी यामुळे जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.
निसर्गाने नुकसान झालेल्या शाळांसाठी वाढीव निधी खर्च करणारजिल्हा वार्षिक योजनेसाठी आजवर मंजुरी मिळालेला हा सर्वात मोठा निधी असणार आहे. निसर्ग वादळात रायगड जिल्ह्यातील जवळपास १५०० शाळांचे मोठे नुकसान झाले होते. या शाळांच्या दुरुस्तीसाठी हा निधी वापरण्यात येईल. त्याच बरोबर जिल्ह्यात वादळामुळे नादुरुस्त झालेल्या अंगणवाड्या, स्मशानभुमी यांची दुरुस्ती यामध्यमातून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. ग्रामिण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाविन्यपूर्ण योजने आंतर्गत या वर्षी मोबाईल रॅपिड रिस्पॉन्स वेईकल आणि मोबईल डायलेसिस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. त्याच बरोबर बोट रुग्णवाहीकेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात फार्मा महाविद्यालय आणि शासकीय विधी महाविद्यालय होणार सुरूअलिबाग उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर आता फार्मा आणि विधी महाविद्यालय ही जिल्ह्यातील माणगाव येथे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी मंत्री उदय सामंत यांनी जागा बघून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना फार्मा शिक्षण घेण्यासाठी बाहेर न जाता जिल्ह्यातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच शासकीय विधी महाविद्यालयाचाही फायदा येथील तरुणांना होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.