रायगड - जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन योजना राबविताना कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. पाणी योजनेत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावरही कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मार्च 2021पर्यंत रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या आढाव्याची बैठक
रायगड जिल्ह्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या आढाव्याची बैठक आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्रीमहोदयांनी बैठकीबाबत माहिती दिली. पालकमंत्री अदिती तटकरे, राजीप अध्यक्षा योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार मनोहर भोईर आदी उपस्थित होते.
जलजीवन योजनेंतर्गत सर्वांना पाणी देण्याचा उद्देश
जलजीवन योजनेंतर्गत 2024पर्यंत सर्वांना पाणी पोहोचले पाहिजे, हा उद्देश या योजनेतून पूर्ण करायचा आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ही जलजीवन योजना राबविण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात रखडलेल्या 27 योजना बंद करून त्या नव्याने 55 लीटर प्रतिव्यक्ती याप्रमाणे पूर्ण कराव्यात, लिकेजची कामे पूर्ण करावीत, त्याचबरोबर नवीन टाक्यांच्या बाबत सूचना आल्या आहेत. ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही गावांना एमआयडीसी लाइनवरून पाणी देण्याची मंजुरी देण्यात आली आहे, असे पाटील यांनी माहिती दिली. पाणी योजनेत ज्या तालुक्यांनी चांगले काम केले त्याचे मंत्री महोदयांनी अभिनंदन केले आहे.