महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांनी जिल्ह्यात पिकविलेल्या भाज्यांनी खाल्ला भाव

रायगड जिल्ह्यातही संचारबंदीने मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी स्थानिक भाजी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहेत.

रायगड
रायगड

By

Published : Apr 11, 2020, 6:33 PM IST

रायगड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले असल्याने सगळीकडे संचारबंदी लागू झाली आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय खासगी वाहतूक बंद आहे. रायगड जिल्ह्यातही संचारबंदीने मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी स्थानिक भाजी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजी बाजारात आता बाहेरून येणाऱ्या भाजीपेक्षा स्थानिक भाजीला मागणी वाढत चालली असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.

रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका परिसर वगळता इतर तालुक्यात कोरोनाची लागण झालेली नाही. ही बाब आनंदाची असली तरी संपूर्ण जिल्ह्यात सध्यातरी संचारबंदी लागू आहे. संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा सोडून खासगी वाहतूक तसेच नागरिकांनाही कामाव्यतिरिक्त फिरण्यास बंदी आहे. भाजी ही अत्यावश्यक सेवेत असल्याने भाजी बाजार सुरू आहे. मात्र, पुणे तसेच मुंबई येथून येणारी भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिकणाऱ्या भाज्यांनी चांगलाच भाव खाल्ला आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतकरी पाले भाजी, गवार, टॉमेटे, मिरची, भेंडी, वांगी, वाल, कोबी, फ्लावर, तोंडली, दुधी, शिराळा यासारखी गावठी भाजी पिकवतात. ही पिकवलेली भाजी स्थानिक भाजी बाजारात जाऊन विकतात. कोरोनामुळे बाहेरील जिल्ह्यातून येणारी भाजीची आवक कमी झाल्याने नागरिकांचा स्थानिक शेतकऱ्यांकडील गावठी भाजी घेण्याकडे ओढा आता वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीला मागणी वाढली असून त्याच्याही गाठीला आता पैसा साठू लागला आहे.

कोरोनामुळे सध्या देशभरात सर्व व्यवसाय ठप्प झाले असून फक्त शेतकरी राजा हा आज आपल्या शेतात राबून या कठीण परिस्थितीत नागरिकांसाठी अन्न पिकवत आहेत. स्थानिक शेतकरीही आपल्या शेतात पिकवत असलेल्या भाजी पिकाला मागणी मिळत असल्याने सुखावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details