पेण(रायगड) - लॉकडाऊन आणि जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटावर मात करुन पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती फॉरेनला निघाल्या आहेत. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरले होते. त्यातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना कलाकारांनी पेण शहरातील कला केंद्रामधून 1500 ते 2000 गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठवल्या आहेत. इंडोनेशिया व मॉरिशसला बाप्पाच्या मूर्ती विमानाने गेल्या आहेत. तर दुबई, थायलंडसह इतर देशात मात्र समुद्रमार्गाने मूर्ती पाठवण्यात आल्याची माहिती पेण येथील कला केंद्राच्या मालकांनी दिली आहे.
दरवर्षी पेण तालुक्यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होते. पेण तालुक्यातून दरवर्षी सुमारे 1 लाख गणेश मूर्ती फॉरेनला जातात. लंडन, ऑस्ट्रेलियन, थिवी व अमेरिका येथे बाप्पाच्या मूर्ती कंटेनरमधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात. या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात. परंतु यावर्षी लॉकडाउनमुळे या देशांना बाप्पाची वारी होऊ शकली नाही. यावर्षी सुमारे 25 हजार गणेशमूर्तींची वारी फॉरेनला होणार आहे.
प्रत्येक गणेशभक्तांच्या घरात पोहोचणार गणेश मूर्ती
लॉकडाऊन व निसर्ग चक्रीवादळाचा गणेश मूर्तींच्या कामावर जरी परिणाम झाला, तरी लहान आकाराच्या गणेशमूर्ती बनवण्याकडे कारखानदारांचा कल आहे. प्रत्येक भाविकाच्या घरांमध्ये पूजेसाठी मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी गणेशमूर्ती कारखानदारांनी चंग बांधला आहे. 6 इंचापासून 4 फुटापर्यंत पीओपीच्या गणेश मूर्ती बनवण्यात येत आहेत. तसेच 6 इंच ते 2 फुटापर्यंत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्यात येत आहेत. हिंदू संस्कृती व प्रथा अखंडित राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही पेण तालुक्यातील गणेश मूर्ती कारखानदारांनी दिली.
यावर्षीही 20 लाख गणेशमूर्ती बनवण्याचा निश्चय