रायगड -प्री-वेडिंग शूटिंग करणाऱ्या जोडप्यांना आता प्रशासनाचे अभय मिळणार आहे. प्री-वेडिंग शूटिंगमधून पर्यटन विकास साधा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. याबाबत पोलीस आणि प्रशासन यांनी नियमावली तयार करावी, असेही अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी, पर्यटन स्थळी प्री-वेडिंग करणाऱ्या जोडप्यांना आणि शुटींग करणाऱ्यांना आता कोणतीही अडचण येणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन येथे नगरपरिषद पाणी पुरवठा योजना आणि समुद्रकिनारा सुशोभीकरण भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रवींद्र राऊत शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केलेल्या भाषणात अजित पवार यांनी प्री-वेडिंग बाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
जोडपे हनिमूनलाही रायगडात आले पाहिजे- अजित पवार प्री-वेडिंग शूटिंगबाबत होत होत्या भानगडी-लग्न होण्याआधी आता प्री-वेडिंग शूटिंगचे फॅड आले आहे. नवीन जोडपे यांची समुद्रकिनारी, पर्यटन स्थळी शुटींग करून त्यांचा फोटो अल्बम आणि सीडी दिली जाते. त्यामुळे शुटींग करणाऱ्या व्यवसायिकांनाही चांगलाच आर्थिक फायदा होत असतो. मात्र अनेकवेळा प्री-वेडिंग शुटिंगसाठी नियमावली नसल्याने भांडणाचे प्रसंग निर्माण होत असतात. त्यामुळे पोलिसापर्यंत हा विषय जातो आणि आर्थिक भुर्दंड पडतो. मात्र, त्यांना रीतसर परवानगी दिल्यास हे वाद टाळले जातील असेही पवार यावेळी बोलताना म्हणाले.
प्री-वेडिंग शूटिंगला अभय द्या-प्री-वेडिंग शुटींग करणाऱ्या जोडप्याना अभय द्या, त्याबाबत पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रित येऊन याबाबत नियमावली तयार करा. एखादे प्री-वेडिंगसाठी आलेले जोडपे हनिमून साजरे करण्यासह लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यासाठी रायगडात आले पाहिजे, यातून पर्यटन वाढीलाही चालना मिळेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत.