रायगड - जिल्ह्यात ११ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्याने श्रावणाआधी येणारी दीप अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या रायगडकरांना लॉकडाऊनमध्येच साजरा करावी लागणार आहे. लॉकडाऊन काळात मटण, चिकन, मद्याची दुकानेही बंद असल्याने तळीरामांना गटारी साजरी कशी करायची? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने दुकाने बंद असली तरी ऑनलाइन किंवा फोनवर ऑर्डर घेऊन मटण, चिकन, मद्याची घरपोच सेवा देण्यास प्रशासनाची परवानगी आहे. त्यामुळे तळीरामांची तसेच रायगडकरांची गटारी रविवारी उत्साहात साजरी होणार आहे.
आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस हा दीप अमावस्या म्हणजे गटारीने संपतो. त्यानंतर श्रावण महिना सुरू झाल्याने उपवास सुरू होतात. त्यामुळे गटारी अमावस्येपूर्वी येणारा नॉनव्हेजचा दिवस रायगडकर मटण, चिकनवर ताव मारून आणि मद्याचे पेग रिचवून साजरा करतात. दरवर्षी गटारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पै-पाहुण्यांना बोलावून मटण, चिकन, वडे, आंबोळ्या याचा बेत आखला जातो, तर काहीजण स्पेशल पार्टीचे आयोजन करून चिकन, मटणसोबत मद्याचे पेग रिचवले जातात.