रायगड -पेण तालुक्यातील कामार्ली गावात विहिरीतील दुषित पाणी पिल्यामुळे सुमारे 50 ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा त्रास झाला. त्यांच्यावर पेण उपजिल्हा रुग्णालयात व कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून तातडीने पावले उचलन्यात आली आहेत. गावात आरोग्य पथक तपासणीसाठी पाठवले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.
दुषित पाणी पिल्याने कामार्लीतील ५० जणांना गॅस्ट्रोची लागण पेण तालुक्यातील कामार्ली हे आमदार धैर्यशील पाटील यांचे गाव आहे. कामार्ली गावातल्या विहिरीत हेटवणे धरणातील पाणी पाईप द्वारे विहिरीत सोडले जाते. विहिरी मध्ये पाणी सोडण्यासाठी टाकलेली पाईप गटारातुन आलेली आहे. त्यामुळे गटारातील पाईप लाईन फुटली असून गटाराचे पाणी पाईप वाटे विहिरीत गेले असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.
कामार्ली गावातील ग्रामस्थ या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गावांतील ग्रामस्थ जेवण करुन झोपले असताना अचानक रात्री 9 च्या सुमारास गावांतील ग्रामस्थांना रात्रीपासून उलटी, जुलाब, पोटात मळमळणे, असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कामार्ली गावात काही जणांना गेस्ट्रोची लागण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार 15 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून 12 जणांना उपचारानंतर सोडले आहे, 3 जण उपचार घेत आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी गावात तपासणी करीत असून रुग्ण आढळल्यास तात्काळ त्याच्यावर उपचार करत आहेत. पाईप लाईन गटारातून आली असून ती फुटून दूषित पाणी विहिरीत गेले असल्याचा अंदाज आहे.
या घटनेचे वृत्त कळताच आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव, जि.प.सदस्या निलिमा पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बापू दळवी, मांगरुळ सरपंच निता दळवी, मांगरुळचे माजी सरपंच मंगेश दळवी, अॅड.सुरेश दळवी आदींनी कामार्ली गावात आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.