रायगड - महाड औद्योगिक वसाहती मधील इंडो अमाईन लिमिटेड या कंपनीत सायंकाळच्या सुमारास वायू गळती झाली. यामध्ये सात कामगारांना रासायनिक वायूची बाधा झाल्याने त्यांना महाड मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वायू बाधा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
उत्पादन विभागात वायू गळती
प्राथमिक माहितीनुसार, महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या इंडो अमाईन या कारखान्यात सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास उत्पादन विभागात वायू गळती झाली. यामुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार जखमी झाले. जखमींना महाड मधील देशमुख नर्सिंग होम या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर कामगारांना हायड्रोजन सल्फाईड वायूची बाधा झाल्याचे कंपनी व्यवस्थापक जयप्रकाश शेट्टी यांनी सांगितले.