रायगड- कळंबोलीत खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वीच खांदेश्वर पोलिसांनी खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला रंगेहाथ पडकले होते. त्यानंतर पुन्हा कळंबोलीत सात जणांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पनवेलच्या आजूबाजूला अनेक आदिवासी पाडे असून येथून खवल्या मांजर पकडून त्यांना जास्त किंमतीला विकण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. यातील सात जणांची टोळी ही खवल्या मांजर विक्रीसाठी कळंबोली वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी एका क्विड कारमध्ये पाच व्यक्ती आपल्याबरोबर एका रुग्णवाहिका गाडीत खवल्या मांजर घेऊन आले होते. पोलिसांनी या सात जणांना त्याब्यात घेतले असता रुग्णवाहिकेमध्ये एका गोणपाटात एका स्टीलच्या टाकीत त्यावर ब्लँकेटमध्ये हा खवल्या मांजर ठेवला होता. त्याचे वजन हे साधारण ७ किलो ७९० ग्रॅम होते. टाकीत हे मांजर झाकून ठेवल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. पोलिसांनी त्याला डॉक्टरकडे नेले असता ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे मांजर चिपळूण येथून आणून पुण्याला नेण्यात आले. पुण्यावरून ते एका रुग्णवाहिकेतून कळंबोलीत आणण्यात आले होते.