नवी मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी उर्वरित दिग्गज नेते आणि उमेदवारांची रीघ लागलेली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईकांनी आपला अर्ज दाखल केला. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांची उसळलेल्या गर्दीमुळे संपूर्ण नवी मुंबई भाजपमय झाले होते. दोन तासांपेक्षा अधिक वेळ भर उन्हात प्रचाररथावर गणेश नाईक यांच्यासह नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी स्वार झाले होते.
नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासाठी अखेर त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गणेश नाईक यांना एबी फॉर्म देण्यात आला असून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मी निवडणूकीत लढणार नाही, तर त्यानेही निवडणूक न लढवण्याचे ठरवले होते, मुलाच्या हट्टापायीच मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश नाईक यांनी दिली. विषेश म्हणजे काल बेलापूर मतदारसंघातुन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या मंदा म्हात्रेंच्या शक्तिप्रदर्शनात गणेश नाईक दिसून आले नव्हते. त्यानंतर आज गणेश नाईक यांच्या रॅलीत ही मंदा म्हात्रे कुठेच दिसल्या नाहीत. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील दरी अजूनही स्पष्टपणे जाणून येत आहे.