रायगड -'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक प्रचलित म्हण आहे. ही म्हण एका बालकाच्या रुपाने सत्यात उतरली आहे. महंमद बांगी (4) या चिमुकल्याला तब्बल 18 तासाच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, आई नौशिन बांगी यांचा मृत्यू झाला असून दुसरी मोठी मुलगी आयशा ही अद्याप सापडलेली नाही. आजोबा महंमद अली हे आपले नातू आणि मुलगी जिवंत असू दे याबाबत प्रार्थना करीत होते. त्यांच्या या प्रार्थनेला ईश्वराने साद दिली आहे. सध्या महंमदवर महाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी मै अंधेरेमे अल्लाहसे पानी मांग रहा था, असे त्याने घरच्यांना सांगितले.
दरम्यान, महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. या इमारतीत महंमद अली यांची कन्या नवशीन बांगी ही ए विंगमध्ये आपल्या तीन मुलासह आयशा बांगी (6), महंमद बांगी (4) रुकय्या बांगी (2) तिसऱ्या मजल्यावर राहत होती. इमारत कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली दाबल्या गेले. याबाबत नवशीन बांगी हिच्या भावाला कळल्यावर त्वरित त्याने आपले वडील महंमद अली यांना फोन करून मंडणगड पंदेरी येथून महाडला येण्यास सांगितले.