महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये धडकेनंतर रिक्षा अन् कार पेटली, 4 ठार; बघा जिवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ - raigad accident

रायगडमध्ये रिक्षा-कारच्या धडकेनंतर सीएनजीचा स्फोट, 4 ठार
रायगडमध्ये रिक्षा-कारच्या धडकेनंतर सीएनजीचा स्फोट, 4 ठार

By

Published : Mar 29, 2021, 5:10 PM IST

Updated : Mar 29, 2021, 8:57 PM IST

16:57 March 29

रायगडमध्ये धडकेनंतर रिक्षा अन् कार पेटली, 4 ठार

रायगडमध्ये रिक्षा-कारच्या धडकेनंतर सीएनजीचा स्फोट

रायगड : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर डिकसळनजिक सोमवारी दुपारच्या सुमारास रिक्षा आणि कारची भीषण धडक झाली. यानंतर क्षणार्धातच दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या दुर्घटनेत रिक्षातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन्ही गाड्याही जळून खाक झाल्या.

क्षणार्धात गाड्यांनी घेतला पेट

डिकसळमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर 29 मार्च रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. नेरळहून कर्जतकडे जाणाऱ्या रिक्षा क्रमांक एमएच 05 सीजी 4351 ला मागून येणाऱ्या कार क्रमांक एमएच 01 सीजे 2948 ने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यानंतर दोन्ही गाड्यांनी क्षणार्धात पेट घेतला. यावेळी वेळेत रिक्षाबाहेर न पडू शकल्याने रिक्षातील चौघांचा यात होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांपैकी एका वाहनाच्या सीएनजी टाकीचा स्फोट होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याचा अंदाज सुरूवातीला वर्तविण्यात आला होता.

घटनेवर कर्जतमधून हळहळ

स्थानिकांनी तत्काळ या अपघाताची माहिती पोलीस व कर्जत अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाल्या. मात्र तोवर चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तसेच दोन्ही गाड्याही जळून राख झाल्या होत्या. या दुर्घटनेत रिक्षातील सरिता मोहन साळुंके(रा. नेरळ), सुभाष जाधव व शुभांगी सुभाष जाधव(रा. बदलापूर) यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी किती बळी?

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर ठेकेदाराने कामे अर्धवट केल्याने मागील काही दिवसांत हा मार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचा आरोप यानंतर आता नागरिकांकडून होत आहे. या रस्त्यावर दुभाजक व स्पीडब्रेकर यांची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याने या मार्गावर आणखी किती बळी जाणार अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

Last Updated : Mar 29, 2021, 8:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details