रायगड- कोरोनाच्या संकटात सर्व प्रमुख यंत्रणा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेवर तर सद्या प्रचंड ताण आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह आरोग्यसेविकाही या युद्धात जिकरीचे काम करत आहेत. जिल्ह्यातील 400 आरोग्यसेविका, 1 हजार 760 आशा सेविकाच्या मदतीने लसीकरणाचे काम करत आहेत. त्यांच हे काम फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू आहे. त्यांच्या या कामामुळे लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही बालक अथवा गरोदर माता वंचित राहिलेले नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे. एकीकडे डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक हे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यसेविका या कोरोना योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाच्या काळात नवजात बालकासह 16 वर्षीय मुलांपर्यंत आणि गरोदर मातांना लसीकरण देण्याचे काम आरोग्यसेविका आणि आशा सेविका करत आहेत.
कोरोनाच्या संकटकाळात सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून त्याबरोबर आरोग्य सेविकासुद्धा परगावातून येणाऱ्या नागरिकांची माहिती आणि त्यांची तपासणी करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या आरोग्य सेविकांचा नागरिकांशी संपर्क येत असल्याने कोरोनाबाधा होण्याची शक्यता निर्माण होऊन लसीकरण करणाऱ्या मुलांना आणि गरोदर मातांनाही याची लागण होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे आणि शिक्षण आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी एकत्रित बैठक घेऊन आरोग्य सेविका यांना फक्त लसीकरण काम देण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयामुळे लहान मुले आणि गरोदर माता यांना कोरोना लागणाचा धोका टळला आहे.