रायगड -राज्याचे माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे काल मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी १४ सप्टेंबरला उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रविवारी महाड वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा अमित याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
प्रभाकर मोरे हे रायगडच्या महाड विधानसभा मतदार संघातून १९९०, १९९५ आणि १९९९ असे सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे ग्रामविकास खाते तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होते. पक्षांतर्गत वादामुळे काही वर्षांपूर्वी ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यानंतर पुन्हा ते शिवसेनेत आले होते. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तसेच कोथूर्डे धरणाच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता.