रायगड -निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागच्या समुद्रकिनारी धडकणार आहे. रायगडच्या किनारपट्टीला याचा मोठा फटका बसणार आहे. चक्रीवादळासोबत मुसळधार पाऊसही पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळा, मंगल कार्यालय, समाजमंदिरांमध्ये हलवण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत.
Nisarga Cyclone : रायगड जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले - अलिबाग चक्रीवादळ न्यूज
बुधवारी निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागच्या समुद्रकिनारी धडकणार आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळा, मंगल कार्यालय, समाजमंदिरांमध्ये हलवण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत.
जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळ हे अलिबाग समुद्रकिनारी येणार असल्याचे समजताच प्रशासनाकडून वेगवान हालचाली करण्यात आल्या. एकट्या अलिबाग तालुक्यात एनडीआरएफच्या तीन तुकड्या आल्या असून त्यांनी समुद्र किनारी गावातील परिस्थितीची पाहणी केली आहे.
अलिबाग तालुक्यात अलिबाग, आक्षी, किहीम, नागाव, मांडवा, रेवदंडा, वरसोली याठिकाणी समुद्र किनारे आहेत. जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्यातील पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या नागरिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.