रायगड - महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा होत आहे. मराठी भाषा, संस्कृती, साहित्य टिकले पाहिजे याबाबत शासन प्रयत्नशील आहे. एकीकडे मराठी भाषा टिकवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील आक्षी गावातील इ स १०१२ मधील मराठीतील पहिलागद्यगळ शिलालेख मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मराठीतील हा पहिला शिलालेख जतन करणे महत्वाचे असून याकडे जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभागासह शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी आक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थानी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीत शंकर मंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दोन शिलालेख आहेत. शालिवाहन शक 934 म्हणजेच इ स. 1012 साली तयार करण्यात आलेले हे शिलालेख आहेत. या शिलालेखाला आज 1008 वर्ष पूर्ण झाले आहेत. मराठीतील हा पहिलाच शिलालेख असून यावर संस्कृतमध्ये कोरून लिखाण केले आहे.