रायगड -जिल्ह्यातील ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग लागली आहे. उरण तालुक्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत दोन कर्मचारी दुखापग्रस्त झाल्याची माहिती आहे. नव्या प्रकल्पाचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडून आग लागली असल्याची माहिती आहे.
गुरुवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पामध्ये आग लागल्याची घटना घडली. ओएनजीसी प्रकल्पामध्ये नव्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पामधील नाल्यांमधून बाहेर जाणारे तेल एका पाण्याच्या तलावामध्ये साठविण्यात येते. या तेलावर प्रक्रिया करून, तेल वेगळे करण्यात येते. या साठवण तलावाला अचानक आग लागल्याने मोठा भडका उडाला होता. यावेळी सुरू असलेल्या कामातील मजुरांमध्ये गोंधळ उडाला. तर बनारसी भुईया २८, बबनु सूरज भूईया ४० हे दोन मजूर कामगार सुमारे 20 टक्के भाजले आहेत. या मजुरांवर उरणच्या पालवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.