'तौत्के' वादळाचा फटका मच्छिमारांना, कमाईचे दिवस जाणार वाया - चक्रीवादळाचा मच्छिमार बांधवांना फटका
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ धडकले, आता तौत्के चक्रीवादळ रायगडच्या दिशेने उद्या 16 मे पर्यत येत आहे. यावेळीही या वादळाचा फटका हा मच्छिमार बांधवांनाच सर्वाधिक बसणार आहे. वादळ समुद्रात होत असल्याने मच्छिमार बोटींना मच्छीमारीसाठी जाण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर 7 जून नंतर पावसाळा सुरू होत असल्याने कमाईचे दिवस हे वादळामुळे वाया जाणार असल्याचे मच्छीमार बांधवांचे म्हणणे आहे.
Financial blow to the fishermen
रायगड -गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ धडकले, आता तौत्के चक्रीवादळ रायगडच्या दिशेने उद्या 16 मे पर्यत येत आहे. यावेळीही या वादळाचा फटका हा मच्छिमार बांधवांनाच सर्वाधिक बसणार आहे. वादळ समुद्रात होत असल्याने मच्छिमार बोटींना मच्छीमारीसाठी जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हजारो नौका समुद्रावर विसावल्या आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवाना पुन्हा आर्थिक संकटाची झळ पोहोचणार आहे. वादळाच्या अनुषंगाने घेतलेला हा आढावा..
समुद्रात कोणतेही वादळ आले की आधी याची झळ पोहचते ती मच्छिमारांना. प्रशासनाकडून मच्छिमारांना वादळ येणार असल्याने समुद्रात मच्छिमारी करण्यास बंदी घातली जाते. त्यानंतर हजारो मच्छिमार बोटी या किनाऱ्याला विसावल्या जातात. याचा परिणाम हा मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर पडत असतो. तौत्के चक्रीवादळच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने समुद्रात मच्छीमारी करण्यास बंदी घातली आहे.
मच्छीमार आर्थिक संकटात -
आधीच समुद्रात मासळी कमी झाली आहे. त्यातच दरवर्षी येणाऱ्या वादळाने मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडत आहे. डिझेल खर्च, कामगारांचे पगार, घरखर्च, कर्जाचे हफ्ते भरताना मच्छीमार हा मेटाकुटीस येत आहे. शासनाकडूनही पॅकेज जाहीर करूनही मच्छीमारांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव हा आर्थिक खाईत लोटला जात आहे.
पुढील काही दिवसही जाणार वाया -
वादळ हे 17 मे ला गुजरातकडे वळणार आहे. त्यानंतर मच्छिमार हा मासेमारी करण्यास समुद्रात जाऊ शकतो. मात्र वादळामुळे समुद्रात मिळणारी मासळी ही मिळणे कठीण जाते. त्यानंतर 7 जून नंतर पावसाळा सुरू होत असल्याने कमाईचे दिवस हे वादळामुळे वाया जाणार असल्याचे मच्छीमार बांधवांचे म्हणणे आहे.
Last Updated : May 15, 2021, 8:36 PM IST