रायगड -शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमदार तथा रायगड भाजपचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली येत्या २६ जानेवारीला दुपारी २ वाजता कर्जत तालुक्यातील रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उद्रेक आंदोलन होणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, झोपलेल्या रिलायन्स प्रशासनाला जागे करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा -खोपोलीतील नामांकित पेपको कामगारांना 30 वर्षांनंतरही न्याय मिळणार का?
कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापूर, गणेगाव, कडाव, कर्जत यासह ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी उपोषण केले. अनेकवेळा पत्रव्यवहार केला. ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा, असे सक्षम प्राधिकारी यांनी आदेश दिले. असे असतानाही रिलायन्सकडून अद्याप कुठलाच प्रतिसाद नाही. रिलायन्स आणि दलाल यांनी शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक केली असून, प्रकल्पाचे काम पूर्ण होताच मोबदला देण्याबाबत टाळाटाळ सुरू आहे. अनेकवेळा बैठका झाल्या, परंतु निर्णय शून्य अशी स्थिती असताना शेतकऱ्यांनी अजून किती दिवस वाट पाहायची ? एकीकडे या प्रकल्पामुळे पीक घेता आले नाही, तर दुसरीकडे निसर्गानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत पिकांचे नुकसान केले. अशा स्थितीत दिन दुबळ्या शेतकऱ्याने आपला उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा
भारतीय जनता पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांवर अन्याय झाला, त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलो आहोत. गेल्या वर्षभरापासून मी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स तसेच सरकारकडे पाठपुरावा करत आहे. परंतू, रिलायन्स अथवा प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासीन असून हा विषय मार्गी लावण्यासाठी कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. म्हणून या झोपलेल्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला त्वरित देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांसह हे आंदोलन करत असल्याचे आमदार प्रशांत ठाकुर यांनी सांगितले.