रायगड - शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी विभागाकडून शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अलिबाग जिल्हा कृषी विभागातील कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे कृषी विभागाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आता एकाच छताखाली सुटणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनात कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या शेतीबाबत अनेक समस्या आहेत. कृषी विभागात आल्यानंतर त्यांना योग्य माहिती, यासाठी शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन कक्ष राज्यातील 500 तालुका, जिल्हा आणि विभागीय कार्यालयात कार्यान्वित केले असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिली. शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन कक्षात येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो सन्मान देऊन त्याच्या समस्येचे निराकरण कक्ष अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे. कक्षात येणाऱ्या शेतकऱ्याला पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था तसेच मासिके, कृषी योजनांची माहिती पुस्तिकाही ठेवण्यात येणार आहे, असेही भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभर अभिवादन!
शेतकऱ्यांच्या अडचणी या कृषी व्यतिरिक्त पंचायत समिती, वीज, बँक कार्यालयाशी संबंधित असतील तर त्या अडचणी या तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या 13 विभागाच्या समितीमार्फत सोडविल्या जातील. या समितीची तीन महिन्यातून बैठक संपन्न होऊन कक्षात नोंद झालेल्या शेतकऱ्याच्या समस्यांचे निराकरण करेल, अशी ही संकल्पना असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या समस्या या कक्षात येऊन सोडवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.