महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : विघ्नहर्त्यावर कोरोनाचे विघ्न ! - Aditi Tatkare

देशात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा फटका राज्यातील अनेक लहानमोठ्या उद्योगांना बसला आहे. यातून प्रत्यक्ष विघ्नहर्ता गणपती बाप्पाचीही सुटका झाल्याचे दिसत नाही. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारे गणेश मूर्ती कारखाने या लॉकडाऊनच्या काळात बंद आहेत. त्यामुळेच अगदी साडेतीन महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवाची पुरेशी तयारी न झाल्याने गणेश मूर्ती कारखानदार देखील धास्तावले आहेत.

Lockdown Effect on Ganpati Industries
भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्यावरच लॉकडाऊनमुळे विघ्न

By

Published : May 5, 2020, 5:51 PM IST

Updated : May 5, 2020, 7:55 PM IST

रायगड -संपूर्ण जगभरात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. भारतातही कोरोनाचा कहर पहायला मिळतो आहे. याच पार्श्वभूमीवर देशात मागील 40 दिवसांपासून लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या लॉकडाऊनचा देशातील विविध उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. महाराष्ट्रासह जगभर गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. या उत्सवासाठी लागणाऱ्या विविध आकारातील सुबक गणेश मूर्त्या घडवण्यासाठी मूर्तिकार वर्षभर काम करत असतात. त्यातही मोठ्या कारखानदारांसाठी नोव्हेंबर ते गणेशोत्सवापर्यंतचा कालावधी कमी पडतो. जानेवारी ते ऑगस्ट अथवा सप्टेंबर हा काळ तर सर्वात घाईचा. मात्र, यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि या कारखान्यांनाही टाळे लागले.

भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्यावरच लॉकडाऊनमुळे विघ्न...

हेही वाचा...'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट' : जंगलात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' कुटुंबांना अखेर मदत मिळाली

गणपतीचे माहेरघर...

रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि हे गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यातही पेण, हमरापूर, कळवा, जोहे ही गावे तर मुळ नावांपेक्षा गणपतीची गावे म्हणून ओळखली जातात. या गावांत घरोघरी वर्षभर गणपतीचे काम चालणार कारखाने आहेत. संपुर्ण कुटुंब आणि त्यांच्या जोडीला पगारी कामगार यांसह येथे गणपतीचे कारखाने वर्षभर सुरु असतात. साधारणतः गणपती विसर्जन झाल्यानंतर पंधरा दिवसांनी या गावांमध्ये पुन्हा गणपती मूर्ती तयार करण्यास सुरुवात होते. पेण येथील आकर्षक, सुबक गणपती मूर्त्यांना जगभरातून मागणी असते. मात्र, लॉकडाऊन सुरु झाले आणि या सर्व व्यवसायिकांच्या नियोजनावर पाणी फिरले. सध्या या मूर्तिकारांच्या कारखान्यात गणेश मूर्ती घडवण्याचे काम थांबले आहे.

एक हजार कारखाने बंद तर सुमारे अडीच लाख कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड...

पेण तालुक्यात साधारण एक हजारपेक्षा जास्त गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत. या लहानमोठ्या कारखान्यांमध्ये हजारो कामगार काम करतात. या सर्व कामगारांचा खरेतर कलाकारांचा उदरनिर्वाह हा या व्यवसाय आणि तेथे मिळणाऱ्या पगारावर अवलंबून असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे कारखाने बंद झाले. व्यवसायिक लोक घरगुती पातळीवर कारखान्यात काम करत असल्याने या कलाकारांवर बेरोजगारीची टांगती तलवार असल्याचे पहायला मिळत आहे.

या वर्षी 22 ऑगस्टला गणेशोत्सव...

पाच लाखापासून ते 25 लाखांपर्यंत कर्ज असल्याने कारखानदार चिंतेत...

यावर्षी 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. मात्र, आता या उत्सवावर कोरोना संकटाचे काळे ढग दाटले आहेत. गणपती कारखाने चालवण्यासाठी कारखानदार बँका, पतसंस्था येथून कर्ज काढून व्यवसाय करत असतात. मात्र, लॉकडाऊ असल्याने कारखाने कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळेच गणरायाच्या मूर्त्या कधी पूर्ण होणार, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. बँकेचे कर्ज, पतसंस्थामधून घेतलेले कर्ज, त्यांचे हफ्ते, कामगारांचा पगार आदी प्रश्न कारखानदारांसमोर उभे ठाकले आहेत. 'एका एका व्यवसायिकावर साधारणतः 5 लाख ते 25 लाखांपर्यंतचे कर्ज असते' असे हमरापूर येथील गणेश मूर्ती बनवणारे कारखानदार लहू ठाकूर यांनी म्हटले आहे.

यावर्षी परदेशातील गणपतींची अनेकांना अद्याप ऑर्डर नाही...

तालुक्यातील अनेक मोठ्या मूर्तीकारांनी अद्याप परदेशातील गणेश मूर्तींची ऑर्डर आली नसल्याचे म्हटले आहे. पेण तालुक्यातून जगभरातील अनेक देशात गणपती नेले जातात. जगातील अनेक राष्ट्रे इंग्लंड, फ्रान्स, मॉरिशियस, अमेरिका, चीन, जपान आदी देशात भारतातून गणेश मूर्ती पाठवल्या जातात. मात्र, जगातील ही राष्ट्रे सध्या कोरोनाच्या गडद छायेत असल्याने येथून गणपतीसाठी ऑर्डर आल्या नाहीत. या सर्व गोष्टींमुळे गणेश व्यवसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये घरगुती स्तरावर काम सुरु...

कच्चा माल उपलब्ध होत नाही.. लॉकडाऊन लवकर उठवा !

मोठ्या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्ल‌ॅस्टर ऑफ प‌ॅरिस हे, देशातील अन्य राज्ये राज्यस्थान, गुजराज आणि दक्षिणेकडील राज्यातून येते. मात्र, कोरोनामुळे आता या राज्याच्या सीमाबंद आहेत. त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खुल्या आहे. त्यामुळे हा कच्चा माल गणेश व्यवसायिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा कच्चा माल उपलब्ध करणे, पैशाची गुंतवणूक उभी करणे, कामगारांचा रोजगार यांमुळे चिंतीत झालेल्या हमरापूर येथील गणपती व्यवसायिक वैभव ठाकूर यांनी, 'शासनाने गणपती व्यवसाय करणाऱ्याचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून गणेश कारखाने सुरू करण्याची परवानगी द्या' अशी मागणी केली आहे.

पालकमंत्र्यांकडून व्यवसाय सुरु करण्याबाबत आश्वासन..

दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांची पेण तालुक्यातील मुर्तीकारांनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी गणेश मूर्ती कारखानदारांना सरकार दरबारी मागण्या मांडून लवकर मार्ग काढण्याबाबत आश्वस्त केले होते. 'राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन असून, आता लॉकडाऊन पुन्हा १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगाराची चिंता असताना आता बाप्पाची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांची देखील चिंता वाढली आहे. जेमतेम साडे तीन महिने हातात असताना बाप्पाची मूर्ती साकारायला कारखाने बंद असणे, मुर्ती साकारण्यासाठी लागणारी माती व साहीत्य उपलब्ध नसणे, आदी समस्यां आहेत. याबाबत आपण शासनाकडे लाॅकडाऊन काळात मुर्तिकारांना लवकर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, याचा पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे' असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सव होणार ना ?

महाराष्ट्र आणि गणेशोत्सव हे एक मोठे समीकरण आहे. संपूर्ण जगात जरी आता गणेशोत्सव साजरा होत असला, तरिही राज्यात मोठ्या धुमधडाक्यात हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई आणि पुणे ही तर शहरे गणोशोत्सवाची केंद्रच. पुण्यातील मानाचे गणपती आणि मंबईतील मोठ्या गणेशमूर्ती, आकर्षक देखावे हे गणेशोत्सवाचे मोठ्ठ आकर्षण असते. मात्र, हीच दोन शहरे राज्यातील तसेच देशातील कोरोनाची हॉट स्पॉट असल्याने यावर्षीच्या गणेशोत्सवाबाबत गणेशभक्तांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोरोनाचे राज्यावरील सावट पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गणेशोत्सव साजरा होणार की नाही, अथवा कसा? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत.

हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष: आम्ही कोरोनाने नाही तर गढूळ पाण्याने मरू! आता तरी कोणी लक्ष देईल का?

Last Updated : May 5, 2020, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details