रायगड -बालकांवरील अत्याचाराच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, अत्याचारात वाढ होऊ नये, गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलाचे पुर्नवसन व्हावे, बालकांना सुरक्षीत वातावरण मिळावे यासाठी रायगड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. रायगड पोलिसांनी अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणातील पहिले बालस्नेही पोलीस केंद्राची स्थापना केली आहे. बालस्नेही पोलीस ठाण्यात बालकाच्या अत्याचाराचे निराकारण, पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने अलिबाग पोलीस काम करणार आहेत. जिल्ह्यात रोहा आणि कर्जत याठिकाणीही अजून दोन बालस्नेही पोलीस केंद्र स्थापन होणार आहेत.
कोकणातील पहिलेच बालस्नेही केंद्र
शासनाच्या आदेशानुसार बालकांच्या अत्याचाराचे निराकरण करण्यासाठी बालस्नेही पोलीस ठाणे योजना तयार करण्यात आली आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या आवारात बालस्नेही पोलीस केंद्र तयार करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्याला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, या केंद्राच्या भिंतीवर विविध प्राण्यांचे चित्र रेखाटण्यात आले आहेत. बालकांना या पोलीस ठाण्यात सुरक्षीत वाटावे अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. कोकणातील हे पहिलेच बालस्नेही पोलीस केंद्र आहे.
बालकांच्या तक्रारींचे निराकारण होण्यास मदत
पोलिसांच्या साचेबद्ध कामाला फाटा देऊन समाजोपयोगी दृष्टिकोन समोर ठेऊन, हे बालस्नेही पोलीस केंद्र तयार करण्यात आले आहे. बालकांवरील अत्याचाराचे निराकरण, गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन, मुलांचे समुपदेश या बालस्नेही केंद्रात केले जाणार आहे. तसेच बालकांवरील अत्याचारात वाढ होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. या बालस्नेही कक्षात पोलीस कर्मचारी यांच्यासह, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचार तज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ यांचीही मदत घेतली जाणार आहे.