रायगड - किल्ले रायगडावरील सर्वात मोठा असलेला हत्ती तलाव हा दीडशे वर्षानंतर पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. रायगडासाठी ही आनंदाची बाब आहे. किल्ले रायगडच्या संवर्धनाचे काम हे रायगड प्राधिकरण मार्फत सुरू आहे. या माध्यमातून हत्ती तलावाची गळती, दुरुस्ती आणि डागडुजीचे काम करण्यात आले. त्यानुसार हा तलाव पावसाच्या पाण्याने भरून गेल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
किल्ले रायगडला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी किल्ले रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून किल्याचे जतन आणि संवर्धनाचे काम छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. किल्ले रायगडावर असलेला हत्ती तलाव, हा सर्वात मोठा तलाव असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या तलावाचा वापर केला जात होता. मात्र कालांतराने हत्ती तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने यातील पाणी हे कमी होऊ लागले.
हेही वाचा -पावनखिंडीतला थरार जिवंत करणाऱ्या 'जंगजौहर' सिनेमाच पहिलं पोस्टर लाँच
किल्ले रायगडच्या जतन व संवर्धन कामात हत्ती तलावाची सुशोभीकरण आणि गळती कामे हाती घेण्यात आले. छत्रपती संभाजीराजे यांनी जातीने या कामात लक्ष घालून हत्ती तलावाचे काम पूर्ण केले. त्यांच्या या कामाला यश आले असून यावर्षी पावसात हत्ती तलाव हा पूर्णपणे भरून गेला आहे. किल्ले रायगडावरील हा हत्ती तलाव दीडशे वर्षानंतर पूर्णपणे भरला गेल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.