रायगड - पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील (पीएमसी) आर्थिक गैरव्यवहार प्रकणात अडकलेल्या राकेश आणि सारंग वाधवा यांच्या अलिबागमधील आवास येथील फार्म हाऊसवर ईडीने छापा टाकला. करोडो रुपयांच्या या अलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळून आल्या आहेत.
हे वाचलं का? - पीएमसी बँक आर्थिक घोटाळा : बँकेचे माजी संचालकाला माहिम येथून अटक
बंगल्याच्या आवारात कार आणि अन्य गाड्या आढळून आल्या आहेत. यापैकी एक कार कर्नाटकमधील असून दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केलेल्या आहेत. तसेच ईडीच्या छाप्यात मालदीवमध्ये एक याट आणि एअरक्राफ्टही आढळून आले आहे. मात्र, या कारवाई बाबत जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाला कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले आहे.
हे वाचलं का? -पीएमसी बँकेच्या संचालकांचे भाजपशी संबंध - गौरव वल्लभ
राकेश व सारंग वाधवा यांचा अलिबाग तालुक्यात आवास सासवणे या ठिकाणी फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये 22 खोल्यांचा आलिशान बंगला असून बंगल्याच्या परिसरात आलिशान कार, नौका अशी करोडोची संपत्ती आहे. सदर बंगला व आतील कार, नौका ही संपत्ती ईडीने जप्त केली असून स्वतःचे सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.
बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवा यांच्या नावावर आहेत, तर कर्नाटक पासिंगची कार ही हाऊसिंग डेव्हलपरच्या नावावर दिसत आहे. पीएमसी प्रकरणात ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने आतापर्यंत दोन ठिकाणे शोधली आहेत. वाधवाच्या जवळचे सहकारी कोण होते? याचा शोध घेण्यात येत आहे.
हाउसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल) चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा यांना गुरुवारी पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बँकेच्या कथित घोट्याळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने केलेली कारवाई ही गुप्त ठेवण्यात आली असून याबाबत जिल्हा व पोलीस प्रशासनालाही अंधारात ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी डायमंड किंग निरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा केल्यानंतर त्याचा अलिबाग किहिंमधील बंगला जमीनदोस्त करण्यात आला होता.