महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू - raigad latest news

देशातला खोतीच्या विरोधातील शेतकऱ्यांचा पहिला संप हा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील चरी या गावात झाला. २७ ऑक्टोंबर १९३३ मध्ये सुरू झालेला हा संप तब्बल सात वर्षे चालला होता. पुढील सात वर्ष शेतजमीन बांधबंदिस्त करण्यात आली, असा हा चरीचा शेतकरी संप १४ वर्ष चालला होता.

चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू
चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू

By

Published : Apr 14, 2021, 4:16 PM IST

रायगड - देशातला खोतीच्या विरोधातील शेतकऱ्यांचा पहिला संप हा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील चरी या गावात झाला. २७ ऑक्टोंबर १९३३ मध्ये सुरू झालेला हा संप तब्बल सात वर्षे चालला होता. पुढील सात वर्ष शेतजमीन बांधबंदिस्त करण्यात आली, असा हा चरीचा शेतकरी संप १४ वर्ष चालला होता. याच शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा लागू झाला. चरी येथील या शेतकऱ्याच्या संपामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सी डी देशमुख, मोरारजी देसाई यांचे पाय चरी गावाला लागले आहेत. नारायण नागू पाटील यांनी या संपाचे नेतृत्व करून शेतकऱ्यांची खोती विरोधात मोट बांधली होती.

चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू
शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी केले नेतृत्व-
कोकणातल्या खोतीच्या पद्धतीने कष्टकरी शेतकरी गांजला होता. कुळाने जमीन कसायची आणि त्यापैकी ७५ टक्के उत्पन्न खोताच्या घरी द्यायचं, अशी अनेक वर्षे ही अन्यायकारक पद्धत सुरू होती. रायगडमधील शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला 1933 साली वाचा फोडली. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिला शेतकरी संप पुकारण्यात आला. नारायण नागू पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांची एकजूट करून खोती विरोधात आवाज उठविला.
चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू
शेतकऱ्यांची संपामुळे दयनीय अवस्था-
खोती विरोधात शेतकऱ्यांनी संप पुकारला. संप हा टिकणारच नाही, अशी भावना सावकाराची होती. मात्र इरेला पेटलेल्या शेतकऱ्यांनी माघार घेतली नाही. शेतकऱ्याच्या घरची आर्थिक स्थिती खालावली. शेती व्यतिरिक्त काम करून मिळेल ते खाऊन शेतकऱ्यांनी संप यशस्वी केला. संप पुकारण्यात आल्यानंतर चरी, रायंदे, कोपरपाडा, कोलटेंभी कोपर या गावातील जमिनी खार्‍या पाण्याने भिजून गेल्या होत्या. हा संप मिटविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. चरीचा हा संप ऐतिहासिक ठरला.
चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू
डॉ बाबासाहेब आंबेडकर आले चरीला-
शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साथ मिळाली. बाबासाहेब स्वतः चरीला आले आणि शेतकऱ्यांच्या भावना समजवून घेतल्या. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकर्‍यांच्या वतीने कोर्टात उभे राहिले. इंग्रज काळात इंग्रजांच्या जुलमी कायद्यासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चरीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
संपाची पार्श्वभूमी-
जमिनदारीतून कुळांना मुक्त करण्याची मुख्य मागणी संपकरी शेतकर्‍यांनी केली होती. तो संप हा जमिनदार विरुद्ध शेतकरी असा होता. सन १९३० मध्ये लोकनायक अणे यांच्या अध्यक्षेत रोहा तालुक्यातील अष्टमी येथे झालेल्या शेतकरी परिषदेनंतर नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वात उरण आणि चरी येथे शेतकर्‍यांनी संप पुकारला. या संपाला खरंतर चिरनेर जंगल सत्याग्रह आणि ब्रिटीशांच्या पोलिसांनी केलेला गोळीबाराची किनार होती. तो तत्कालिक असंतोष होता. त्यातून संप सुरू झाला. या संपाची दखल त्यावेळच्या मुंबई प्रांत सरकारने घेतली होती. संपादरम्यान चरी येथे एक शेतकरी परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. तर ना. ना. पाटील हे स्वागताध्यक्ष होते. शामराव परुळेकर, अनंत चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस आदी शेतकरी नेतेही यावेळी चरी येथे उपस्थित होते. शेतकऱ्याच्या संपाला अधिक धार आली होती. अखेर १९३७ मध्ये म्हणजे तब्बल सात वर्षानंतर मुंबई प्रांतात बाळासाहेब खेर यांच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळातील महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी चरीला भेट दिली. शेतकरी आणि जमिनदारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी शेतकर्‍यांच्या बाजुने निकाल दिला आणि चरीच्या संपाचा यशस्वी समारोप झाला.
चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू
चरी गावात स्मारक-
त्याकाळी सात वर्षे काढलेल्या हालअपेष्टांमुळेमुळे आज चरीच्या गावकऱ्यांना अच्छे दिन आले, असे म्हणायला काहीच हरकत नाही. या लढ्यामुळे '"कसेल त्याची जमीन" हे धोरण अमलात आलं आणि "कुळकायदा" तयार करण्यात आला.' शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ लढ्याचे स्मारक चरी या गावात उभारण्यात आलेले आहे. या संपाची आठवण म्हणून शेतकऱ्यांचं अवजार असलेले टिकाऊ याचा वापर स्मारकस्तंभातील ज्योतीमध्ये केलेला आहे. असे अनेक टिकाऊ मिळून ही ज्योत तयार केलेली आहे. या स्मारकस्तंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय आर.आर. पाटील उर्फ आबा यांच्या हस्ते करण्यात आले. झुंजार नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ असा सात वर्षे अभूतपूर्व संप केला. प्रामुख्याने या संपामुळे कुळकायदा निर्माण झाला आणि स्वातंत्र्यानंतर कसेल त्याची जमीन हे नैसर्गिक तत्त्व प्रस्थापित झाले. त्यामुळे खोत, सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून समस्त शेतकरीवर्ग मुक्त झाला. या गौरवशाली संपातील लढवय्या शेतकऱ्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी त्या संपाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे स्मारक उभारले गेले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत महायज्ञ आणि महाप्रसाद-
चरी गावाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिल्यानंतर येथील बौद्ध वाडी येथे महायज्ञ आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य पूर्व काळात जातीभेदभाव असला तरी अलिबाग तालुक्यात जातिभेदभाव हा त्याकाळीही नव्हता. चरी गावात अठरा पगड जातीचे लोक एकोप्याने नांदत होते. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चरी येथे आल्याने गावकऱ्यांचे भाग्यच होते. त्यानिमित्त केलेल्या महापूजेनंतर महभोजन सर्वांनी एकत्रित केले. त्यामुळे चरीचा शेतकऱ्यांचा हा संप एकतेचे प्रतीक म्हणूनही ऐतिहासिक ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details