रायगड - जिल्ह्यात यावर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाने हाहाकार उडवला असून अजूनही पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1519 गावांमधील 16 हजार 534 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला, आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. नवीन शासन निर्णयानुसार शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार 400 रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन एकर आणि गुंठ्यांत असल्याने तुटपुंजा मोबदला यामुळे मिळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात 1 लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा 1 लाख 4 हजार हेक्टरवर भातलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठड्यात अतिवृष्टी झाल्याने आणि शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहीले. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खरडून गेली. बांध फुटले, उधाणाचे पाणी आले. शेतामध्ये माती भरली, दगड गोटे आले, त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. एकूण क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्रावरील भात शेतीचे नुकसान झाले आहे.