रायगड -पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून पनवेलच्या पहिल्या महापौर म्हणुन मान मिळवणाऱ्या डॉ. कविता चौतमोल यांनी आज महापौर पदाकरिता भाजपकडून अर्ज दाखल केला. राज्यात ज्याप्रमाणे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं, तोच प्रयोग आता पनवेल महापालिकेतही राबवला जातोय. पनवेल महापौर पदासाठी महाविकासआघाडीकडून शेकापच्या प्रिया भोईर यांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी भाजप-आरपीआय आघाडीकडून जगदीश गायकवाड यांनी तर शेकाप आघाडीमार्फत सुरेखा मोहोकर यांचा अर्ज दाखल केला गेला आहे.
पालिकेत भाजपची तब्बल 51 नगरसेवकांसह एकहाती सत्ता आहे. पनवेल महापालिकेमधील पक्षीय बलाबल पाहिले असता, भाजप - 51, शेकाप - 23, काँग्रेस - 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस - 2 असे एकूण 78 नगरसेवक आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी जरी आली तरी भाजपची एकहाती सत्ता आणि महाविकासआघाडीकडे नसलेलं संख्याबळ यावरून पनवेलचा महापौर हा भाजपचाच असणार हे स्पष्ट आहे. तरीही सध्या राज्यात असणाऱ्या राजकीय अस्थिरतेमुळे पनवेल भाजपच्या गोटात निरुत्साहाचे वातावरण आहे.