रायगड- रायगड जिल्ह्याला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे या समुद्राच्या पाण्यात स्नानाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांना यानिमित्ताने मुरुड आणि आगरदांडा समुद्रामध्ये डॉल्फिनचे दर्शन बऱ्याच वेळेला होत आहे.
गोवा येथे पर्यटनास येणारे पर्यटक डॉल्फिन पाहण्यासाठी बोटीने समुद्रात आवर्जून जात असतात. त्यामुळे, येथील नागरिकांनाही रोजगार मिळत असतो. जिल्ह्यातील मुरुड समुद्रात आगरदांडा दिघी जलमार्ग, तसेच पद्मदुर्ग किल्ला पाहायला जातानाही डॉल्फिनचे दर्शन होत असते. या ठिकाणी स्थानिक बोट मालकांनी डॉल्फिन दर्शन सुरू केले तर, येणारे पर्यटकही डॉल्फिन पाहण्यासाठी आवर्जून भेट देवू शकतील. त्यामुळे रोजगाराची संधी स्थानिकांना प्राप्त होऊ शकते.