रायगड - शासनाने तिन्ही झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने अत्यावश्यक दुकानांसह इतर काही दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये आला असल्याने जिल्ह्यातही अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानेही सुरू झाली आहेत. शासनाने दिलेल्या परवानगीनुसार सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यत दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक प्रशासन हे आपल्या अधिकारात दुकानाची वेळ बदलत आहेत. याबाबत जिल्ह्यातही सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने उघडी राहतील, हा निर्णय लागू असून जिल्हाधिकारी शिवाय जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत तसेच कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना, स्थानिक प्रशासनाला दुकानाच्या वेळा कमी आणि वाढविण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत.
दुकानांच्या वेळा बदलण्याचा अधिकार नगरपालिका, नगरपंचायतींना नाही - जिल्हाधिकारी
दुकानाच्या वेळेत बदल करण्याचा अधिकार हा कोणालाच नसून तो अधिकार जिल्हाधिकारी यांनाच आहे, असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्हा हा पनवेल महानगरपालिका वगळता ऑरेंज झोनमध्ये येत आहे. शासनाने ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसह मद्याच्या दुकानासह इतर दुकानेही उघडली गेली आहेत. शासनाने दिलेल्या आदेशानुसार सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यत ही दुकाने उघडी ठेवली जाणार आहेत. मात्र काही ग्रामीण, शहरी भागातील स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे आपल्या अधिकारात नसताना दुकानाच्या वेळामध्ये बदल करीत आहेत. त्यामुळे नागरिक हे दुपारपर्यंत वेळ असल्याने दुकानात तसेच बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. संध्याकाळी सात वाजेपर्यंत शासनाची परवानगी असतानाही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे शासनाच्या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहे.
शासनाने ग्रामीण, शहरी भागातील दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत उघडी ठेवायची आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळायची आहे. ज्याठिकाणी गर्दी होत असेल अशा ठिकाणची दुकाने बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. दुकानाच्या वेळेत बदल करण्याचा अधिकार हा कोणालाच नसून तो अधिकार जिल्हाधिकारी यांनाच आहे, असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले.