पेण (रायगड) - निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पेण तालुक्यातील वादळग्रस्त भागाची पाहणी करून तालुक्यातील वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल असे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी पेण प्रांत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीचा झालेल्या मोठ्या नुकसानाविषयी माहिती देताना सांगितले, की नव्याने पोल व डिपी उभी करणं अथवा डीपी बसवणे हे सहज शक्य आहे, परंतु जुने साहित्य वापरून त्याची पुनर्बांधणी करणे खूप धोक्याचे आहे. कारण या चक्रीवादळाने पेणसह, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलांची झालेली पडझड ही पडझड मोठ्या प्रमाणात आहे. तेथे पोल पुन्हा उभे करणे खूप जिकिरीचे काम आहे, त्यातच कोरोनामुळे मनुष्यबळ इतर जिल्ह्यातून बोलावणं कठीण झालेल आहे. कारण ज्याप्रमाणे महावितरण कंपनीचे नुकसान झालेले आहे त्या प्रमाणात मनुष्यबळ कमी आहे. कमी मनुष्यबळामुळे पोल उभे करणे डिपी उभ्या करणे कठीण होऊन बसले आहे, तरी देखील ग्रामस्थांच्या मदतीने आणि महावितरण कंपनीच्या असलेल्या मनुष्यबळाच्या जोरावर एकूण चोवीस स्विचींग उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले आहे. लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल. यामध्ये उच्च दाब वाहिनी २६२ पैकी १६७ (रोहित्र) डीपी ६७६३ पैकी २८९८ तर १९०५ गावांपैकी ८०४ गावांमध्ये आजच्या घडीला वीज पोहोचली आहे, सध्याच्या स्थितीला ५१ ठेकेदारांचे ९४२ तर महावितरण कंपनीचे १४४२ कर्मचारी काम करत आहेत. रायगड जिल्ह्याचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ७४६ अधिक मनुष्यबळ नाशिक, ठाणे, नवी मुंबई, कल्याण व वाडा येथून रायगडला नियुक्त केलेला आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पेणसह रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. राज्यमंत्र्यांना महावितरण कंपनीला वीज जोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या कमतरते विषयी विचारणा केली असता, त्यांनी साहित्याची कमतरता पडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल असे सांगितले.