रायगड - तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यात नुकसान झाले. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, महाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. अलिबागेत मच्छीमार जेट्टी, उसर येथील पडलेली पाण्याची टाकी आणि घराची पाहणी केली. मच्छीमार बांधवांनी जेट्टी रुंदीकरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिले आहे. यावेळी मच्छीमारांच्या अडचणी ऐकून त्या राज्य शासनामार्फत सोडविण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले.
अलिबाग मच्छीमार जेट्टीला दिली देवेंद्र फडणवीसांनी भेट -
अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून वादळाच्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा सुरू झाला. अलिबाग कोळीवाड्यात असलेल्या जेट्टीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. तौक्ते चक्रीवादळ असल्याने शेकडो बोटी अलिबाग किनाऱ्याला लावण्यात आल्या होत्या. वादळी वाऱ्याने एकमेकांवर आटपून बोटीचे नुकसान झाले आहे. याबाबत फडणवीसांनी जेट्टीला भेट देऊन मच्छीमार बांधवांच्या अडचणी ऐकून घेतल्या.