रायगड -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही रायगड दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव, बागमळा, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी निरुपणाकर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणला तडाखा दिला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत.
फडणवीस यांनी आज अलिबाग तालुक्यातील नागाव, बागमळा, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान, फडणवीस यांनी बागायतदार शेतकऱ्यांकडून माहितीही घेतली. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन ठाकूर, जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते हे देखील उपस्थित आहेत.