रायगड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅप्टन क्रिकेटच्या मैदानात उतरून विकेटपर्यंत जातात आणि पॅव्हेलीनमध्ये परतून मी बारावा खेळाडू म्हणून बाहेर राहतो, असे सांगतात. त्यामुळे कॅप्टननेच मैदान सोडून पळ काढल्यामुळे तुम किस खैत की मूली हो, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुनील तटकरेंना लगावला. ते आज पेणमध्ये महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
देशाला विकासाकडे कोण घेऊन जाऊ शकतो, यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व इतर पक्ष मिळून महाआघाडी केली आहे. मात्र, ही महाआघाडी नसून खिचडी आघाडी आहे. याचे नेते राहुल गांधी असून त्यांनी जाहीरनाम्यात गरिबांना ७२ हजार रूपये देणार, असे सांगितले आहे. पण कुठून आणि कसे देणार? याबाबत त्यांनी काहीच कल्पना दिली नाही. याचे आजोबा, आजी, वडील पंतप्रधान झाले. मात्र, गरिबी हटली नाही. त्यामुळे तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी गांधींवर केली.
ते म्हणाले, काँग्रेसला ६० वर्षे संधी देऊनही सामान्य जनतेचे त्यांनी भले केले नाही. त्यांनी फक्त आपल्या नेत्यांना मोठे केले. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची भाषणे म्हणजे मनोरंजनाचे साधन आहे. या सभेला अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री रवींद्र पाटील, महेश मोहिते, जिल्हाप्रमुख किशोर जैन आणि सुरेंद्र म्हात्रे उपस्थित होते.