रायगड- पनवेलच्या कुंडेवहाळ गावात प्लास्टिकच्या गोणीत एका मुलाचा मृतदेह आढळला. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पनवेलमध्ये सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कुंडेवहाळ गावात जेएनपीटी रोडच्या कडेला प्लास्टिकच्या गोणीत एका मुलाचा बेवारसपणे मृतदेह पडून असल्याचे दिसून आले. पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीत एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पाटील यांनी पनवेल शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये गोणीत ८ ते ९ वयोगटातील लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. या लहान मुलाने हिरवा टी-शर्ट आणि काळी हाफ पॅन्ट घातलेली होती.