पनवेल- पनवेलमधल्या गाढी नदीच्या खाडीत एक मृतदेह भरलेली बॅग सापडली आहे. यामधील व्यक्तीचे वय 30 ते 35 वर्ष असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून हा मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे.
हेही वाचा-कांदे स्वस्ताईकडे, प्रति क्विटंल तीन ते साडेतीन हजार रुपयांची घसरण
पनवेलमधल्या हरिग्रामजवळच्या गाढी नदीच्या किनारी एक बॅग आढळुन आल्याची माहिती पनवेन तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बॅग तपासली. यामध्ये 30 ते 35 वय असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह एका काळसर रंगाच्या रेक्झिन बॅगेत आढळून आला. या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बॅगेत गुंडाळून गाढी नदीत फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, निघृणपणे ही हत्या कोणी आणि का केली? तसेच ही व्यक्ती कोण आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा पोलीस तपास करत आहेत. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणखी मदत मिळेल.
दरम्यान, गेल्या आठवड्यात माहिम येथील बीचवर अशाच प्रकारे एक सुटकेस आढळली होती. या सुटकेमध्ये एक मृतदेह आढळला होता. एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले होते. त्यानंतर लगेचच कल्याण स्टेशन परिसरात एका महिलेचे शिर आणि धड गायब असलेला मृतदेह सापडला. त्यापाठोपाठ आता पुन्हा पनवेलमध्ये ही असाच धक्कादायक प्रकार घडला असून पनवेलमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.