रायगड -नाताळसह सलग आलेल्या शनिवार, रविवार सुट्टीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे ही पर्यटकांनी बहरून गेली आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. समुद्रकिनारी जलक्रीडा, घोडा गाडी, उंट सफारी, एटीव्ही सफारीचा आनंद पर्यटक लुटत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेही खबरदारीची पावले उचलली आहेत. नवं वर्षाच्या स्वागतापर्यंत जिल्ह्यात पर्यटकांची भरती ओसंडून वाहणार आहे.
समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल-सलग आलेल्या सुट्या आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे 25 डिसेंबर पासून जिल्ह्यात लाखो पर्यटक मजा करण्यासाठी दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून पर्यटक जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, वरसोली, रेवदंडा, काशीद, मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत.
जलक्रीडासह घोडा, उंट सफारी, एटीव्हीची सफारी-समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना समुद्र स्नानासह जलक्रीडा, घोडा, उंट सफारी, एटीव्ही रायडिंगची सुविधा उपलब्ध आहेत. जलक्रीडा मध्ये बोटींग, बनाना, जेट्सकी राईडचा आनंद पर्यटक लुटत आहेत. जलक्रीडा व्यवसायिक हे पर्यटकांना पॅकेज देत असून सुरक्षित आणि काळजी घेऊन राईड करीत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनाही आर्थिक लाभ होत आहे.
हॉटेल, रिसॉर्ट हाऊसफुल्ल-25 डिसेंबरपासून लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिक आनंदित आहेत. हॉटेल, रिसॉर्टही हाऊसफुल्ल झाले आहेत. कोरोनानंतर आठ महिन्यानंतर हॉटेल, व्यवसायिक यांना पर्यटकांमुळे आर्थिक फायदा होत आहे. येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाच्या पार्श्वभूमिवर काळजी घेतली जात आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनामुळे खबरदारी-कोरोना जिल्ह्यात कमी झाला असला तरी नव्या आलेल्या कोरोना संकटामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारीची पावले उचललीन जात आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच पुढे सोडले जात आहे. जिल्ह्यात नऊ ठिकाणी तपासणी नाका तैनात केले आहेत. पोलिसांनीही जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे.