रायगड -सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या खंडाळा घाट हा पर्यटकांसाठी सज्ज झाल्याचे जणू तो पर्यटकांना खुणावत आहे. रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असणारे व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असणारा खंडाळा हा पर्यटकांसाठी सज्ज झाला असून येथे पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी रोज होत आहे.
पर्यटकांनी गजबजला खंडाळा घाट
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे लोणावळा-खंडाळा येथे दरवर्षी पर्यटकांनी गजबजून जात असून आताही तो गजबजायला लागला आहे. थंडीचे प्रमाण वाढत असल्याने आल्हाददायक हवा मिळण्याचे ठिकाण खंडाळा हा फेमस असल्याने या ठिकाणी पर्यटक आवर्जून येत असतात. मुंबईपासून हाकेचा अंतरावर असणारा हा खंडाळा घाट असून लोणावल्याकडे जाण्यासाठी पहिल्यांदा खंडाळा घाट लागत असल्याने पर्यटक या ठिकाणी आवर्जून थांबून असंख्य पॉईंटचा आस्वाद घेतात. खंडाळा येथे राजमाची किल्ला, राजमाची पॉईंट, खंडाळा घाट, दस्तुरी घाट, अमृतांजन ब्रिज आदी पर्यटकांना पाहायला असल्यामुळे पर्यटक याठिकाणी हवेतील गारव्याचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येतात.
खंडाळा घाटात वाहतूक कोंडी
मुंबई व पुण्याच्या मध्यभागी हा लोणावळा खंडाळा घाट असल्याने पर्यटकांना एका दिवसात परत जाण्यासाठी ही सोपे आहे. त्यामुळे पर्यटक लोणावळा-खंडाळा घाटाचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येत असतात. शनिवारी व रविवारी या दोन्ही सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुण्याहून पर्यटक आवर्जून येत असतात. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग वाहतूक कोंडी होत असून यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.