रायगड - आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठूनामाचा, ज्ञानोबा-तुकोबांचा गरज होत आहे. विठ्ठलभक्तांसाठी आजचा दिवस म्हणजे एक पर्वणीच असते. आषाढी एकादशीनिमित्त अलिबागमधील वरसोली येथील प्रति पंढरपूर असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लागली होती. मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोलीमधील प्रति पंढरपूर असललेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे अडीच वाजता काकड आरती झाली. मंदिराचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा केली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
काकड आरती व विठ्ठल रखुमाई यांची पूजा झाल्यानंतर भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल रखुमाई मंदिरातील गाभारा हा फुलांनी सजवला असून, विठुराया व रखुमाई यांच्या मूर्तीलाही साज श्रुंगारांनी सजवले होते. विठूराय व रखुमाई यांच्या दर्शनामध्ये भक्तगण तल्लीन झाले होते.
मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विश्वस्त मंडळाकडून योग्य नियोजन केले आहे. पावसाळा असल्याने मंदिराच्या पटांगणात मंडप टाकण्यात आला आहे. तर भाविकांना प्रसादासाठी पटांगणात मिठाई व खेळण्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.
सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मंदिरात कीर्तन, भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अलिबाग तालुक्यातून रेवस, बोडणी, नवगाव, वरसोली येथून कोळी बांधवांच्या दिंड्या विठ्ठल मंदिरात येत असतात. तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंड्याही येत असतात. येणाऱ्या भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी विश्वस्त मंडळाकडून सुविधा केली असून, पोलिसांचाही बंदोबस्त मंदिरात ठेवण्यात आला आहे.